पेटीएमची पालक कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सचे प्रमुख विजयशेखर शर्मा यांनी कंपनीतील १०.३० टक्के हिस्सा चीनच्या अलिबाबा समूहातील ॲन्ट फायनान्शियलकडून विकत घेणार आहेत. त्यामुळे कंपनीच्या समभागाने आज शेअर बाजारात ११.६ टक्क्यांची उसळी घेऊन ८८७ रुपयांची पातळी गाठली आहे. आज दिवसअखेर ६.८ टक्क्यांच्या कमाईसह समभाग ८५०.७० रुपये पातळीवर स्थिरावला आहे.
वन ९७ कम्युनिकेशन्सचे विजय शर्मा हे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. विजय शर्मा हे त्यांच्या मालकीच्या Resilient asset management कंपनीमार्फत पेटीएममधील १०.३० टक्के अतिरिक्त हिस्सा Ant financial company कडून खरेदी करणार आहेत. याबाबत नुकताच एक करार झाला असून, यानंतर पेटीएमच्या मालकी रचनेत बदल होऊन त्याचा फायदा कंपनीला होणार आहे. या व्यवहारानंतर शर्मा यांचा पेटीएममधील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हिस्सा १९.४२ टक्क्यांवर जाईल आणि ॲन्ट फायनान्शियलचा हिस्सा १३.५ टक्क्यांपर्यंत खाली येईल.